
पोलीस इन्स्पेक्टर विजय कदम
यांचे आव्हानात्मक वर्ष २०१०-११ कशेडी घाट, आंबेनळी घाट, कापडे ते कामथे रस्ता अशा बिकट वाटांमुळे होणारे अपघात, जमिनी खरेदी विक्रीच्या संदर्भातील गुन्हेगारी, नव्या युगाच्या वाटा गुन्हेगारी क्षेत्राकडे जात असताना झालेला रायगड जिल्ह्यातील पहिला सायबर क्राईम, वर्षाच्या सुरूवातीला झालेला पार्लेवाडीजवळील डबल मर्डर आणि महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेत तिसरे वर्ष उजाडेपर्यंत तंटामुक्त होऊ न शकलेल्या गावांना तंटामुक्त करण्याचे कसब तसेच पोलीस जनतेचा मित्र होण्यासाठी राबवण्याचे उपक्रम आदींद्वारे पोलादपूर पोलीस ठाण्याचे अन् पोलीस इन्स्पेक्टर विजय कदम यांचे सन २०१०-११ आव्हानात्मक वर्ष ठरले. काही ठिकाणी हे आव्हान पेलले तर काही ठिकाणी वर्ग केले असे स्वरूप राहिले तरी पोलादपूर पोलीस ठाणे आणि १ जानेवारी २०१० रोजी येथे कार्यभार स्विकारलेले पोलीस इन्स्पेक्टर विजय द.कदम यांच्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न यशस्वीच असल्याची खात्री देणारी आकडेवारी वर्षअखेरिस पाहण्यास मिळत आहे.
कशेडी घाटातील अपघातांची समस्या ही मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाची मागणी करण्यास रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना प्रवृत्त करणारी ठरली. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षात एकूण ४६ अपघात घडले. यासंदर्भात १६ गुन्हे दाखल झाले असून यापैकी ५ अपघातात ९ ठार झाले आहेत. ११ गंभीर अपघातांत २७ जखमी झाले असून अन्य अपघातांची नोंद ३० आहे. यामध्ये २७ हजार २०० रूपये अपघातातून दंड आकारणी झाली आहे. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथे ३, पार्ले येथे ६, लोहारमाळ येथे ९, येलंगेवाडी येथे ९, चोळई येथे ५, धामणदेवी येथे १० असे ४२ अपघात तर पोलादपूर ते महाबळेश्वर राज्यमार्गावर झालेल्या ४ अपघातांत कापडे, बाहुलीचे टोंक, दाभिळ टोंक आणि पितळवाडी येथे प्रत्येक १ अपघाताची नोंद झाली आहे.लोहारमाळ येथे अँड.साबळे यांच्या ढाब्याजवळ झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील मृतांची नांवे शोधून काढली तरी खुन एकमेकांनीच केला असल्याच्या शक्यतेला छेद देण्यापर्यंत तपासकार्य पूर्ण होऊनही आरोपी अज्ञात असल्याने हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला. तशी मागणी या मृतांच्या नातेवाईकांनी अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण करून केल्याने ही कृती करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील पहिला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँक्टनुसार बलात्कारादरम्यान मोबाईल क्लिप तयार करून वितरीत केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर विजय कदम यांनी आरोपीला ताब्यात घेऊन प्रकरण न्यायप्रविष्ट केले. लोहारमाळ येथील मंदिरामध्ये दानपेटी फोडून झालेल्या रकमेची चोरी तसेच कुंभळवणे येथे निमोही बाली या सिनेअभिनेत्याच्या फार्महाऊसमध्ये झालेली घरफोडी या प्रकरणांतील आरोपी आढळून आले नाहीत. पैठण येथे बीएसएनएलच्या केबलमधून तांब्याच्या तारेची चोरी करणा-या आरोपीस ग्रामस्थांनी पकडून दिल्याच्या घटनेनंतर पोलादपूर शिवाजीनगर भागातून एक मोटारसायकलची चोरी झाली असून त्याबाबत अद्याप तपास लागला नाही. साखर खडकवाडीतील मालुसरे भावकीत झालेल्या गर्दी मारामारीमध्ये परस्परविरोधी फिर्यादी दाखल होऊन २ गुन्हे नोंदण्यात आले तर १० जणांना आरोपी करण्यात आले. पोलादपूर पंचायत समितीतील कनिष्ठ रोखापाल सहायक सचिन राणे याने केलेल्या अपहारप्रकरणी पोलीस इन्स्पेक्टर विजय कदम यांनी केलेल्या तपासानंतर त्याला रेवदंडा येथून दोन कारसह अटक करण्यात आली. गेल्यावर्षी बोरघर-वडघर येथील मुलीचे अपहरण करणारा आरोपी यावर्षी पकडण्यात यश आले. जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांत नायब तहसिलदारासह ९ आरोपी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. दुखापतीचे ७ गुन्हे दाखल असून एसटी ड्रायव्हर असलेल्या सरकारी नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंगाचा १ गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर येथील विवाहित महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात ५ आरोपी करण्यात आले. फेटल अपघातप्रकरणी ५ गुन्हे नोंदण्यात आले तर इतर गुन्हे ११ नोंदविण्यात आले. मोटारवाहन कायद्यानुसार ११५६ जणांविरूध्द दंडात्मक कारवाई करून २ लाख ११ हजार ७०० रूपये जमा केले. हुंडाप्रतिबंधक कायद्यानुसार बीएसएनएलचे कनिष्ठ अभियंता माळवे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.याखेरिज, पोलीस जनतेचा मित्र या उपक्रमानुसार दिवाळी फराळाचा कार्यक्रम पहिल्यांदाच पोलादपूर पोलीस ठाण्याने आयोजित केला.
एडस् जनजागृती मोहिमेवरील मोटारसायकलस्वारास पुढील प्रवासासाठी पोलीसबांधवांनी स्वत:च्या खिशातून मदत केली तर लाँग मार्च गजेंद्रन या सायकलवरून लंडनपर्यंत निघालेल्या वृध्दाला शुभेच्छा दिल्या. शांतता समितीच्या बैठका, रामजन्मभूमी बाबरी मशीद निकालाची पार्श्वभूमी असताना सलोखा राखण्याचे प्रयत्न, महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेंतर्गत भोगाव, पार्ले आणि तुर्भे या ग्रामपंचायतींची निवड करून अशक्यप्राय घटना पोलीस इन्स्पेक्टर विजय कदम यांनी केली. आपत्ती निवारणाच्या मॉकड्रीलवेळी घटनास्थळी सर्वात आधी पोहोचून कर्तव्यतत्परता दर्शविणारे पोलीस ठाणे कौतुकास्पद ठरले. पोलिसांच्या मुलांचा सत्कार पोलीस दरबारात करण्यासोबत २६/११ च्या पार्श्वभूमीवर शास्त्र प्रदर्शन करून पोलीस इन्स्पेक्टर विजय कदम यांनी वेगळा पायंडाही पाडला आहे. निषेध आणि अन्य घटनांवेळी पोलीसांची कर्तव्यकठोरताही पोलादपूरवासियांना पाहण्यास मिळाल्याने येथे कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्याचे श्रेय पोलीस इन्स्पेक्टर विजय कदम आणि त्यांच्या पोलीस सहका-यांना देण्याची अपरिहार्यता निर्माण झाली आहे.
शैलेश पालकर
9226849185
9890320127
पोलादपूर पोलीस इन्स्पेक्टर विजय द. कदम
यांनी केली कौतुकास्पद कामगिरी
शहरातील व्यापा-यांकडे घरकाम,धुणी-भांडी आदी कामे करून उपजिविका करणा-या एका विवाहित महिलेचा मृतदेह नग्न व जखमी अवस्थेत चरई धरणाचा माळ हनुमानवाडीच्या परिसरात बुधवारी आढळून आल्याने पोलादपूर शहरात खळबळ उडाली. खून करण्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची शक्यता व्यक्त होत असताना पोलादपूर पोलीस इन्स्पेक्टर विजय द. कदम आणि सहका-यांनी केवळ २४ तासांत या महिलेच्या खुनप्रकरणी दोघा तरूणांना गजाआड करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
मयत महिलेच्या निम्म्या वयाएवढे दोघा आरोपींचे वय असल्यामुळे या बहकलेल्या तरूणांबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील रानवडी कासारवाडी येथील ३६ वर्षीय विवाहित महिला कमल मुकुंद मांगले ही शहरातील शिरिष साबळे यांच्या घरातील घरकाम नेहमीप्रमाणे आटोपून घराकडे निघाली. मात्र, ती नेहमीप्रमाणे घरी वेळेत पोहोचली नसल्याने तिच्या गावकरी व नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरूवात केली. रात्री ही महिला कोठेही आढळून आली नाही. मात्र, शोधकार्य सुरू असताना बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जंगल परिसरात नग्न अवस्थेत तिचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. याबाबत पोलादपूर पोलीसांना ग्रामस्थांनी कळविल्यानंतर तातडीने पोलीस इन्स्पेक्टर विजय द. कदम यांच्यासह हे.काँ. बाळासाहेब गोडगे, पाशिलकर, प्रमोद लांगी, सुदेश पालकर तसेच काँन्स्टेबल चव्हाण, मोरे, अंबरगे व आडीत यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची खबर महाडचे डीवायएसपी विजय खरात यांना समजताच त्यांनीही तातडीने घटनास्थळी जाऊन तपास कार्यात मार्गदर्शन केले. घटनास्थळी संशयितांनी अनेक पुरावे मागे ठेवल्याने आरोपी पकडण्यासाठी पोलीसांना फारच कमी वेळ लागला. पोलीस इन्स्पेक्टर विजय कदम यांनी डीवायएसपी विजय खरात यांच्या मार्गदर्शनानुसार केवळ तीन तासांत यापैकी एक आरोपी मोहन जानू जाधव (२०) याला त्याच्या कापडे बुद्रुक खांबेश्वरवाडीतील घरातून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत केवनाळे-आंबेमाची येथे मूळचा राहणारा मात्र पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात वाहन चोरी प्रकरणातील गुन्हेगार किशोर ज्ञानेश्वर शेलार (१८) हा कापडे-सकपाळवाडीत भाड्याने खोली घेऊन राहात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी तेथे धडक मारली. मात्र, किशोर शेलार हा तातडीने पुणे येथे पळून गेल्याची माहिती तपासात उघड झाल्याने पोलादपूर पोलीसांनी खासगी वाहनातून हे.काँ. पाशिलकर, वाटवे आणि आडीत यांचे पथक पुणे येथे रवाना केले. या पथकाने बुधवारी रात्रीच पुणे येथून किशोर शेलार याला ताब्यात घेतले. पोलादपूर पोलीसांनी दोन्ही आरोपींना महाड येथे न्यायालयासमोर उभे केले असता दोघांना ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.